Thursday, 26 May 2016

जय मल्हार

!! श्री !!
जय मल्हार

राहुल ने नुकतीच नवीन कंपनी जॉईन केली होती. हे शहर हि त्याला नवीन होते. त्याच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या. अजून मनाजोगे मित्र हि मिळाले नव्हते.
दीपिका मात्र थोड्या मोठ्या गावात आल्यामुळे खुश होती. स्त्री सुलभ स्वभावामुळे तिने लगेच 4 मैत्रिणी जोडल्या होत्या. गोसिपिंग करण्या इतपत प्रगती हि तिने केली होती. तिचे कोणी दूरचे नातेवाईक हि इथे राहत होते. राहुल त्यांना ओळखत नव्हता. अरे, ते आपल्या लग्नाला नव्हते का आले, माझे मावस मामा. तुझ्या अजिबात लक्ष्यात राहत नाही. अशी मुकाफळे हि तिने उधळली होती. पण लग्नाला आलेल्या शेकडो लोकांमध्ये ते  ‘कोल्हे’  ह्या रुक्ष नावाचे मामा, एका भेटील कसे लक्ष्यात राहणार ? त्यामुळे राहुल ने आताही दुर्लक्ष्य केले.
गुरुवार ची सकाळ, कंपनी ला सुट्टी असल्यामुळे, राहुल निवांतपणे, देशात किती असहिष्णुता आहे ह्याचा अंदाज पेपर मधून घेत होता. इतक्यात दीपिका चहा व बिस्किटे घेवून आली. आज काय विशेष ह्याचा अंदाज घेत असतांनाच दीपिका ने विचारले, तुम्ही माझ्या मामांची तब्येत बघायला केव्हा जाणार आहे ? त्यांची सर्जरी होवून 8 दिवस होवून गेलेत. इथे आल्यापासून तुम्ही एकदाही त्यांच्या कडे गेले नाहीत. मला तर शंका आहे की तुम्हाला ते कुठे दिसले तर तुम्ही त्यांना ओळखू तरी शकाल काय ? राहुल ने विचार केला, दीपिका म्हणते ते खरे आहे, त्याला खरोखरच त्यांचा चेहरा आठवत नव्हता. शरणागती पत्करून तो म्हणाला, आज संध्याकाळी मी नक्की म्हणजे नक्की जाणार आहे.
संध्याकाळी ५ च्या सुमारास दारावरील बेल वाजली. राहुल ने दर उघडले तर समोर नाक्यावरचा फुलवाला हातात निशिगंधाचा गुच्छ घेवून उभा होता. म्हणाला, बाई नी सांगितले होते. तितक्यात दीपिका आली व म्हणाली, अहो, मीच सांगितला होता. खास निशिगंधाचा गुच्छ. मामांना निशिगंध फार आवडतो. फक्त जातांना तेव्हढा  आठवणीने घेवून जा.
राहुल संद्याकाळी ७ च्या  सुमारास मामांच्या कॉलनीत पोहचला. गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधतच होता, इतक्यात वाँचमन ने, गाडीत फुलांचा गुच्छ पाहून विचारले, डॉ. कोल्हे का ? सी बिल्डींग मध्ये ४०४. तेथेच ४०३ चे पार्किंग रिकामे आहे, तेथे गाडी लावा. राहुल एकदम चाट.
राहुल सी इमारतीत ४०४ समोर उभा होता. दारावर एकदम कोरी करकरीत पाटी, डॉ. र. म. कोल्हे. राहुल थोडा बुचकळ्यात पडला. त्याने दारावरील बेल वाजवली. दार उघडले. राहुल च्या स्वागता साठी टीव्ही वर निळा घोडा.....गाणे सुरु झाले होते. हातातील गुच्छ पाहून, एका लहान मुलीने त्याला आंत घेतले, व सोफ्यावर बसा म्हणून सांगितले. मुलगी पुन्हा हातातील मोबाईल शी खेळण्यात दंग झाली. दोन महिला, बहुदा त्या सासू व सून असाव्यात, अगदी मनापासून, भक्ती भावाने टीव्ही वरील सिरीयल बघत होत्या. ह्यांना डिस्टर्ब केले तर बहुदा पाप लागेल, ह्या भीतीने राहुल नाईलाजास्तव सोफ्यावर गुपचूप बसला. जाहिराती सुरु झाल्यावर, राहुल ला जी सून वाटली, ती उठून आत गेली. आतून एका वाटीत दोन बाकर वड्या, एक पेढा आणि सोबत पाण्याचा पेला घेवून आली. तिने ते सर्व राहुल समोर ठेवले. इतक्यात पुन्हा सिरीयल सुरु झाली.
राहुल ला सुरुवातीला नेहमी प्रश्न पडायचा की हि सिरीयल कोण बुवा पाहत असेल ? नंतर त्याला तिचा टीआरपी कळला. त्याला पडणार्या प्रश्नांची उंची थोडी वाढली. आता त्याला वाटत असे, की, हि सिरीयल कोण लोक व कसे पाहत असतील ? आज त्याला दोन्हींची उत्तरे मिळालीत. जाहिराती सुरु झाल्यावर सून म्हणाली, सहसा हे, हि सिरीयल कधी चुकवीत नाही. इथे जवळच धोब्याकडे गेले आहेत, येतीलच.
तितक्यात डॉ. कोल्हे आले, त्यांनी राहुल ला बसायला सांगितले. इतक्यात सिरीयल सुरु झाली. ती संपल्यावर ते म्हणाले, चला, नशीब, शेवटचा भाग तरी बघायला मिळाला. बाकी आता रिपीट मध्ये बघावे लागेल.
राहुल म्हणाला, मी राहुल, डॉ. म्हणाले, वा वा राहुलजी  तुम्ही आले खूप छान वाटले. त्यांनी गुच्छ घेण्यासाठी हात पुढे केला, राहुल ने हि काही कळायच्या आत, त्यांना गुच्छ दिला. डॉ. धन्यवाद म्हणाले. राहुल ला काही गडबड होतेय, असे वाटत होते. ह्यांची कुठली सर्जरी झाली असावी बरे ? हे  इतके तरुण कसे दिसतात ? इतक्यात डॉ. म्हणाले, राहुल, सध्या कोणती कंपनी ? तुम्ही लोक सारखी कंपनी बदलीत असता. त्यामुळे मी हल्ली कोणाचीच कंपनी लक्ष्यात ठेवत नाही. घरी सर्व व्यवस्थित सुरु आहे.? राहुल च्या तोंडातून, हो, बाहेर पडलं.  डॉ. म्हणाले, अरे, मागच्या आठवड्यात मला पी. एच. डी मिळाली. सारखी येण्याजाण्यार्यांची गर्दी, त्यामुळे कपडे धोब्याकडे टाकायचे राहिले. आता उद्या कॉलेज जायला चांगले कपडे हवे ना, म्हणून गेलो. येतांना सोसायटी मधील लोक भेटले. अभिनंदनाचा वर्षाव. त्यामुळे मला उशीर झाला व सिरीयल नेमकी चुकली. एरवी मी कधीही चुकवत नाही. आमच्या लहान मुलीला तर ती फारच आवडते, कारण तेव्हा तिला आईचा मोबाईल, खेळायला मिळतो. मोबाईल दिला की ती शांततेने सिरीयल बघू देते. शिवाय तिला निळा घोडा......  हे शीर्षक गीत फार आवडते.
आता राहुल सावध झाला. त्याने छाती फुगवून विचारले, (बहुदा सिरीयल चा परिणाम..) हे डॉ. रमेश कोल्हे चे घर ना ? तसे डॉ. म्हणाले, मी डॉ. रघुनाथ कोल्हे, पीएचडी. रमेश कोल्हे डी इमारतीत २०२ फ्ल्याट मध्ये राहतात. राहुल ने लगेच तेथून निसटता पाय घेतला व तो बाहेर आला. आता तिकडे जावे की नाही ह्याचा विचार करू लागला. कारण गुच्छ तर ह्यांना देवून बसलो.
राहुल डी इमारतीत आला. फ्ल्याट २०२ ची बेल वाजवली. दार उघडले गेले. राहुल चे जोरात स्वागत झाले. या या राहुलजी,  दीपिका चा केव्हाच फोन येवून गेला. तुम्ही खास माझ्या आवडीचा गुच्छ घेवून इकडे यायला निघाले. आम्ही वाट पाहताच होतो. बर झाले, तुम्ही आलात.
राहुल म्हणाला, मी निघता निघता मला माझा मित्र भेटला. त्याला पण ह्याच भागात काम होते. त्याला जिथे जायचे होते, तेथे कार नेणे शक्य नव्हते, म्हणून आम्ही टू व्हीलर वर आलो. ह्या सर्व गडबडीत गुच्छ घरीच कार मध्ये राहिला. काही हरकत नाही, तुम्ही आला हेच पुष्कळ झाले. राहुल ने त्यांना नमस्कार केला व तो हॉल मध्ये स्थानापन्न झाला.
इतक्यात बेल वाजली. पेशंट दार उघडायला गेले. दारात सी इमारतीतील डॉ. कोल्हे आले होते. दारातच पेशंट म्हणाला, मी तुमचे अभिनंदन करायला येणारच होतो, पण अचानक माझी तब्बेत बिघडली. डॉ. म्हणाले, ते मला कळले म्हणूनच मी समाराचाराला आलो. म्हटलं, पेढे द्यावे, सोबत तुम्हाला आवडतो म्हणून खास निशिगंधाचा गुच्छ पण घेवून आलो.
इतक्यात आतून आवाज आला, अहो, आत या ना, दारातच उभे राहून काय बोलता. डॉ. आत हॉलमध्ये आले, त्यांनी राहुल ला पहिले. दोघांना हि काय बोलावे कळत नव्हते. दोन कोल्ह्यामध्ये राहुल सापडला होता. त्याचा चेहरा, मघाशीच बघीतलेल्या सिरीयल मधील, दोन बायकांच्या तावडीत सापडलेल्या देवां सारखा झाला.  जय मल्हार....

प्रदीप जोशी, पुणे
मोबाईल : 94230 43173